साल्हेरचे युद्ध...



   सन १६७१ च्या पावसाळ्यानंतर सुरतेजवळ तळ ठोकून बसलेले दिलेरखान बहादुरखान बागलाणात गेले. त्यांनी साल्हेरच्या बलाढ्य किल्ल्याला वेढा घातला. मराठ्यांनी तो नुकताच घेतला होता. साठ हजारांच्या ह्या मुघल सैन्यात इखलासखान, राव अमरसिंह, मुहकमसिंह इतर बरेच नामांकित सरदार होते. हा वेढा बसवल्यानंतर दिलेरखान रावळ्या किल्ल्याकडे पुढे गेला. बहादुरखान खालच्या बाजूला सुपे चाकणकडे निघाला. शिवाजी महाराजांनी मोरोपंत पेशवा प्रतापराव गुजर ह्या दोघांना एकत्र होऊन साल्हेरच्या वेढ्यावर आक्रमण करायला सांगितले. मोरोपंत त्यावेळी कोकणात होते. त्यांनी घाट चढून प्रतापरावाबरोबर साल्हेरच्या दिशेने कूच केले. त्यांच्याबरोबरही आनंदराव मकाजी, व्यंकोजी दत्तो, रावजी भोसले, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप संताजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो रंगनाथ, मुकुंद बल्लाळ, सूर्यराव काकडे इत्यादी अनेक सरदार होते. हे सैन्य साधारण चाळीस हजाराचे होते. सन १६७२ मधे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते साल्हेरला पोहोचले. सैन्य दोन फळ्यांमधे विभागून त्यांनी मुघलांवर आक्रमण केले. मुघलांनीही तोडीचा प्रतिकार केला तुंबळ युद्ध जुंपले. बरेच सरदार ह्या युद्धात कामी आले. मराठ्यांकडून सूर्यराव काकडे मृत्यूमुखी पडले तर मुघलांकडे इखलासखान, राव अमरसिंह, मुहकमसिंह इतर तीस मृत्यूमुखी पडले. मुघलांना ह्या युद्धात अपार हानी सोसावी लागली. साठ हजार घोडे, दीडशे हत्ती, सहा हजार उंट, हिरेजवाहीर, कपडालत्ता इतर सामग्री मराठ्यांना मिळाली. मुघलांकडील वीस सरदारांना जीवंत पकडले गेले. दिंडोरीच्या युद्धापेक्षा मोठे मोकळ्या मैदानातील युद्ध असूनही मराठ्यांनी ह्यात मुघलांचा मानहानीकारक पराभव केला. सहा मैलाच्या परिसरात हे युद्ध पांगले होते ह्यावरुन त्याची व्याप्ती लक्षात येते. मुघलांकडे जीवित हानीही अमाप झाली. शिवाजी महाराजांनी त्यांच्या सरदार सैनिकांना शाबासकी दिली मोठी बक्षिसेही जाहिर करून त्यांचा सन्मान केला.